अहमदनगर -अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 30 जून रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक जिल्हा प्रशासन लागले निवडणुकीच्या तयारीला-महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ येत्या 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. 2018 साली झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या पाठिंबा दिल्यानं संख्याबळा नुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे अहमदनगरचे महापौर पद गेलं होतं. स्थानिक पातळीवरील सेना-भाजपातील सूनदोपसुंदीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा असतानाही त्यांना सत्तेच्या बाहेर बसावं लागलं. मात्र, 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. राज्यात आता महा विकास आघाडीचे सरकार असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवl आहे. सुरवातीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत असल्याने ही निवडणूक आता 30 जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आता शहरात वेग आला आहे. आयुक्त कार्यालयाकडून महापौर निवडणुकीची तारीख मंगळवारी रात्री कळविण्यात आली. त्यामुळे महापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे काम पाहणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींवर बरच प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणारमहापौर निवडणुकीमुळे शहरांमधील पुढील आठ दिवसात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. महापौरपद हे अनुसूचित जाती जमातीतील महिलेसाठी राखीव आहे. तर उपमहापौरपद खुले असल्याने या पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीतील अनेक जण इच्छुक आहेत. या पदावर काँग्रेस सुद्धा दावा करू शकते. यामुळे उपमहापौरपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
असे आहे महापालिकेतील राजकीय बलाबल सध्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19 नगरसेवक आहेत तर काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक आहेत. भारतीय जनता पक्षाचे 15 नगरसेवक तसेच बहुजन समाज पार्टीचे चार नगरसेवक तर एक अपक्ष असे एकूण 67 चे संख्याबळ महानगरपालिकेमध्ये आहे. सध्या एक जागा रिक्त असून त्या ठिकाणी निवडणूक झालेली नाही. एकूण 68 पैकी 67 नगरसेवक सध्या महानगरपालिकेत कार्यरत आहेत.