अहमदनगर -राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शिक्षण क्षेत्रातील विचारांनी जगात परिवर्तन झाले. त्यामुळे हे शाश्वत विचार घेऊन भारतामध्येही मोठे परिवर्तन होणे सहज शक्य आहे. यासाठी वंचितांच्या शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला आणि सध्याच्या बंदीशाळेचे रुपांतर संधीशाळेत केले तर, देशात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास ज्येष्ठ संशोधक आणि शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळीच्यावतीने आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधील शिक्षण प्रणाली या परिसंवादात ते बोलत होते.यावेळी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अजय पोद्दार, कृतीशील शिक्षक भाऊसाहेब चासकर, अग्नेक्शा स्पायनिस्वा (पोलंड), सबरिना चौधरी (बांगलादेश), अरिफ रेहमान (पाकिस्तान), संदीप वाकचौरे, रिशिका राका, पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, आदी उपस्थित होते.
या परिसंवादात विवेक सावंत म्हणाले, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक गरीब मुले शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्वांना बंदीशाळेतून संधीशाळेत आणणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी शासनाने, विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून दिल्यास हे विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.