अहमदनगर : सध्या गौतमी पाटील या लावणी कलाकाराचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. ती तिच्या नृत्यामुळे आणि नृत्यातील आकर्षक हावभावांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र गौतमी पाटीलबद्दल ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचे मत जरा वेगळे आहे. बऱ्याच गावचे लोक 100 कलाकार असलेल्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाहीत. मात्र दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला ते पाच-पाच लाख रुपये देतात, हे काय चाललंय? लोककलेची गौतमी करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, असा घणाघात त्यांनी केला आहे.
'लोककलेचा ऱ्हास करू नका' :पूर्वी गावात जत्रा असली की तमाशा सादरीकरण होत असे. परंतु आता लोक कलावंताना पूर्वीएवढी मागणी राहिली नाही. तमाशासाठी लोक जास्त पैसे देखील देत नाहीत. जुन्या कलाकारांना 2 लाख देण्यासाठीसुद्धा मागेपुढे पाहणारे मात्र गौतमी पाटीलला गावात बोलावण्यासाठी 5 लाख रुपये द्यायला तयार होतात. ही लोककला आहे. तिला लोक कलाच राहू द्या. तिचा तुम्ही ऱ्हास करू नका, असे रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे.