महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Doctor Removed Stone From Brain In Shirdi: डॉक्टरांनी काढला चक्क मेंदूमधून दगड, साईबाबा रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल - साईबाबा रुग्णालय शिर्डी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयातील न्‍युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांच्‍या न्‍युरो ओटीच्‍या टीमने गेल्‍या पाच महिन्‍यांपासून मेंदूमध्‍ये रुतलेला दगड काढण्‍याची शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली. या शस्‍त्रक्रियेबद्दल संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.

Doctor Removed Stone From Brain In Shirdi
जीवनदान दिलेल्या रुग्णासोबत डॉक्टर

By

Published : Jan 30, 2023, 3:34 PM IST

शिर्डी (अहमदनगर) : साईबाबा संस्‍थान संचलित साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्‍णालयात राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यातून तसेच राज्‍याबाहेरील हजारो रुग्‍ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात. या रुग्‍णालयामध्‍ये मेंदूशल्‍य विभागात दर महिन्‍याला साधारणत: सरासरी ६० ते ७० मेंदू आणि मणक्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया होतात. त्यातीलच परभणीतील सचिन मारके (वय वर्ष ३७ वर्षे) हे गेल्‍या पाच महिन्यांपासून डोक्याला झालेली जखम घेऊन साईबाबा हॉस्पिटल येथे तपासणीसाठी न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांच्याकडे आले. साधारणत: पाच महिन्यांपूर्वी ऑगस्ट २०२२ दुचाकी वरून पडण्याचे निमित्त झाले अन् डोक्याला एक छोटी जखम झाली. सुरुवातीला किरकोळ वाटणारी जखम मात्र बरी होण्याचे नाव घेत नव्हती. औषधे, मलम-पट्टी झाले, मग सीटी स्‍कॅनही झाला. पण निदान झाले नाही. जखमेतून पाणी येणे बंद होत नसल्यामुळे डिसेंबरमध्ये परत सिटी स्कॅन करून औषध चालू केले गेले. तरी पण डोक्याची जखम दाद देत नव्हती.

डॉक्टरही बुचकळ्यात पडले : शिर्डी साईबाबा रुग्णालयातील डॉ. मुकुंद चौधरी यांचे नाव ऐकून रुग्ण पाच महिन्यानंतर उपचारासाठी शिर्डीमध्ये आला. पेशंटची केस पूर्ण समजावून घेत डॉ. मुकुंद चौधरी यांनी पुन्हा सीटीस्कॅनचा सल्ला दिला. सीटीस्कॅन पाहून मात्र डॉक्टरही बुचकळ्यात पडले. कवटीचे हाड तोडून मेंदुमध्ये त्याची गाठ झाली असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी पाच महिने उपचार घेऊन ही गाठ का झाली? हा प्रश्‍न सुटत नव्हता. डॉ. चौधरी यांना ती हाडाची गाठ नसून काहीतरी इतर पदार्थ असल्याची शंका आली. रेडिओलॉजिस्ट डॉ. श्रीकांत नागरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा इतर पदार्थ असल्याची शक्यता व्यक्त केली. योग्य निदान होत नसल्यामुळे पेशंट व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून शस्‍त्रक्रियाची तयारी करण्यात आली.

वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मीळ केस : १७ जानेवारी २०२३ रोजी न्युरो सर्जन डॉ. चौधरी आणि वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे आणि न्यूरो ओटी टीम यांनी ऑपरेशनला सुरुवात केली. पण, सर्जरी करताना जी गोष्ट दिसली त्याने डॉक्टरही चक्रावून गेले. कवटीचे हाड तोडून एक मोठा खडा मेंदूमध्‍ये गेलेला आढळला. आजूबाजूच्या भागाची सर्जरी करून इतर भागाला धक्का न लागू देता मेंदूमधील दगड अलगद काढण्यात डॉ. चौधरी यांना यश आले. शस्‍त्रक्रियेनंतर १० ते १२ दिवस झाले असून रुग्‍णाला कुठलाही त्रास झाला नाही. तसेच झालेल्या जखमेतून पाणी येणेही बंद झाले. ही जागतिक वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मीळ केस असल्याचे डॉ. मुकुंद चौधरी यांनी नमूद केले.

हेही वाचा :Mumbai Crime: क्राईम पेट्रोल पाहून पुजाऱ्याच्या वेशात जैन मंदिरात चोरी करणारा आरोपी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details