महाराष्ट्र

maharashtra

राळेगणसिद्धीमध्ये विजयी उमेदवारांचा बेभान जल्लोष

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये यंदा अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणूक झाली. मात्र विजयी उमेदवारांनी केलेल्या जल्लोषामुळे राळेगणसिद्धी सध्या चर्चेत आले आहे. मिरवणुकीवर बंदी असताना देखील गावात मिरवणूक काढण्यात आली. एवढंच नाही तर उमेदवारांनी डिजेच्या तालावर ठेका देखील धरला. पोलिसांकडून हा डिजे जप्त करण्यात आला आहे.

By

Published : Jan 18, 2021, 5:18 PM IST

Published : Jan 18, 2021, 5:18 PM IST

राळेगणसिद्धीमध्ये विजयी उमेदवारांचा बेभान जल्लोष
राळेगणसिद्धीमध्ये विजयी उमेदवारांचा बेभान जल्लोष

अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये यंदा अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणूक झाली. एका गटाने निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्याने ही निवडणूक झाली. गावात वर्चस्व असलेल्या लाभेश औटी आणि जयसिंग मापारी या दोन्ही गटांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली. आज मतमोजणीनंतर औटी आणि मापारी या अण्णा हजारे समर्थक गटाला अपेक्षित असा विजय मिळाला आहे. सर्व जागा जिंकत औटी आणि मापारी गटाने एक हाती विजय मिळवला.

मात्र यानंतर झालेला विजयाचा जल्लोष आदर्शगाव राळेगणसिद्धीला न शोभणारा असाच म्हणावा लागेल. निकालानंतर राळेगणसिद्धीमध्ये दाखल झालेल्या औटी आणि मापारी गटाच्या विजयी उमेदवारांनी थेट एका जेसीबी मध्ये उभे राहून मिरवणूक काढली आणि बेसुमार गुलालाची उधळण केली. त्याचबरोबर डीजेच्या तालावर समर्थकांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मिरवणुकींवर बंदी घातली आहे. मात्र असे असतानाही गावात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

राळेगणसिद्धीमध्ये विजयी उमेदवारांचा बेभान जल्लोष

पोलिसांकडून डीजे जप्त

दरम्यान याची माहिती पारनेर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी ही मिरवणूक थांबवून डिजे जप्त केला आहे. हा डिजे पारनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. मात्र या प्रकाराने राळेगणसिद्धी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकप्रतिनिधींचे असे वर्तन आदर्श गावाल शोभणारे आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे मात्र कुठलाही डिजे किंवा गुलाल न उधळता उमेदवारांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला विजय साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details