शिर्डी (अहमदनगर) -दिव्यांचा सण असलेला दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीसाठी दिवे लावण्यासाठी मातीच्या पणत्या बनवण्याचे काम शिर्डी जवळील रुई गावातील कुंभारवाड्यात मोठ्या जोमाने सुरू आहे. मात्र बाजारात मिळणाऱ्या चीनी मातीच्या आकर्षक पणत्यांचा मोठा फटका मातीच्या पणत्या बनवणाऱ्या कारागिरांना सोसावा लागत आहे. त्यात आता कोरोनाचाही आर्थिक फटका बसणर आहे.
छबुराव वाकचौरे यांची प्रतिक्रिया कोरोनामुळे शिर्डी साईबाबांचे मंदीर बंद असल्याने याचा मोठा फटका कुंभार व्यावसायाला बसला आहे. छबुराव वाकचौरे हे दररोज एक हजार पणत्या बनवतात. त्या शिर्डीला नेवून विकतात. मात्र, मार्च महिन्यापासून मंदीर बंद झाल्याने त्यांच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. त्याच बरेबरीने कोरोनाकाळात आठवडी बाजारही बंद असल्याने चुली, माठ आणि इतर वस्तूही विकता आल्या नाहीत. दिवाळीला घरोघरी दिवे लावण्याची प्रथा आहे. दिवे लावण्यासाठी पूर्वीपासून मातीच्या पणत्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र, आता बाजारात चिनी मातीच्या आणि प्लास्टिकच्या पणत्याही मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना सुबकता असते. मात्र, दरही अधिकचा असतो. तरीही ग्राहक जास्त त्याकडेच वळतात त्याच तुलनेने मातीच्या पणत्या या अवघ्या वीस रुपये डझन विकल्या जातात. त्यामुळे यंदा तरी ग्राहकांनी आमचा विचार करावा, असे त्यांना वाटते. या व्यवसायाला सरकारकडून हवी ती मदत मिळत नाही
दिवाळीच्या अगोदर काही दिवस या पणत्या बाजारात विकण्यासाठी आणल्या जातात. त्यामुळे या आगोदरच तयार होणे गरजेचे असते, त्यासाठी आता त्या जोराने रात्रंदिवस काम करून कुंभार कारागिर पणत्या तयार करत आहेत. मातीच्या पणत्या फिरत्या चाकावर बनविण्याची ही कला आहे. ही कला आत्मसात केलेले कुंभार कारागिर आपल्या रोजीरोटीसाठी या पणत्या बनवत आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व सण उत्सव साधेपणाने साजरे होत आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीावर ही आर्थिक संकट आहे. त्यात पणत्या बनवणारी माती, त्यासाठी लागणारे मजूर आणि इतर साहित्य महाग झाले आहे. त्यामुळे मातीच्या पणत्या बनवणे, ही महाग पडत आहे. दुसरीकडे या व्यवसायाला सरकारकडून हवी ती मदत मिळत नसल्याचे हे व्यवसायिक सांगतात.
शिर्डीत मोठा उत्सवात साजरी होते दिवाळी
दिवाळी उत्सव साईबाबांचा शिर्डीत मोठा उत्सवात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी देश विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. यावेळी साईबाबांच्या मंदिर परिसरात लाखो दिवे लावतात. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने यंदा भाविक येऊ शकणार नसल्याने पणत्या बनवणारा कुंभार कारागीर यांच्यावर यंदा मोठे संकट कोसळले आहे.
साईमंदीर बंद असल्याने व्यवसायही बंद
शिर्डी साईबाबा मंदीर परिसरातील दुकान व्यवसायिक दररोज एक हजार पणत्या विकत घेत होते. उत्सव काळात साधारणतः दोन हजार पणत्या विकल्या जात होत्या. वर्षाकाठी 2 लाख पणत्या शिर्डीतील दुकान व्यवसायिक घेत होते. मात्र, कोरोनामुळे साई मंदीर बंद असल्याने दुकान व्यवसायही पूर्ण बंद आहे. यामुळे आता पणत्यांना शिर्डीत मागणी नाही. त्यात आठवडी बाजारही भरत नसल्याने सर्वांचा घरात दिवाळीच्या उत्सवात प्रकाश करणाऱ्या कुंभार समाजाच्या घरी यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे.