अहमदनगर - यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असली, तरीही अद्याप कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांना उत्सवाचा आनंद घेतानाच नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आरोग्य विभागाच्या नियमावलीचे पालन करत सण साजरा करा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त डॉ. श्रीकांत मायकलवार या अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रकाशपर्व असं या सणाचा उल्लेख केला जातो. आयुष्यामध्ये आनंद, सुख, भरभराट या अपेक्षांसह दिवाळी साजरी होते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यातच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी कोणताही हलगर्जीपणा करणं चुकीचं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेत गर्दी करणे, फटाके उडवणे, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सॅनिटायझरचा वापर करत असताना पणत्या लाऊ, असे जिल्हाधिकारी म्हणाले. सॅनिटायझरमधील अल्कोहोल यामुळे पेटण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले.