अहमदनगर- राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजहंस दूध संघाच्या वतीने कोरोना संकटात रुग्णांच्या मदतीकरिता 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले आहे.
राजहंस दूध संघ येथे दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन रुग्णालयांना देण्यात आले. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, महानंदा व राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. सुरेश घोलप, डॉ. प्रदीप कुटे, आदी उपस्थित होते.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. या सर्व काळात नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यातील 50 गावे कोरोना मुक्त झाली असून संपूर्ण तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. या संकटात अनेक सेवाभावी व सहकारी संस्थांनी मोठी मदत केली. कारखाना व दुध संघाने तालुक्यातील या संकटात सातत्याने भरीव मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राजहंस दूध संघाने लॉकडाऊन च्या काळात एकही दिवस बंद न ठेवता दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला असून या दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन मुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. हा उपक्रम इतरांसाठी दिशादर्शक असल्याचे ते म्हणाले.