अहमदनगर - एकीकडे पुलवामात शहीद झालेल्यांच्या नावाने मत मागताना दुसरीकडे व्यासपीठावर सैनिकांच्या पत्नींबाबत अभद्र वक्तव्य करणाऱया प्रशांत परिचारक या आमदाराला बसवता, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर केली. जिल्ह्यातील खर्डा इथे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुंडे यांनी टीकास्त्र नरेंद मोदींवर सोडले.
'शहीदांच्या नावाने मते मागतात आणि सैनिक पत्नीवर अभद्र टिप्पणी करणाऱ्याला व्यासपीठावर बसवता' सभेला राजेंद्र फाळके, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, शरद भोरे, संजय वराट, विजयसिंह गोलेकर, कैलास हजारे, रमेश आजबे, अमजद पठाण, पवन राळेभात, आदि उपस्थित होते. अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्याचा संदर्भ देत भाजपला मतदानाचे पुन्हा आवाहन केले होते. तो धागा पकडून धनंजय मुंडे यांनी मोदींना टीकेचे लक्ष केले.
बापाचे न ऐकणारा कुपुत्रच - मुंडे
जो मुलगा बापाचे ऐकत नाही, दुसऱ्या पक्षात जातो त्याला सुपुत्र कसे म्हणणार, तो तर कुपुत्रच असणार, मग त्याचा एव्हढा काय राग यायला पाहिजे अशी टीका धनंजय मुंडे यांनी युतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्यावर केली. सुजय यांनी धनंजय मुंडेंवर सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप जामखेड मध्ये केला होता, या आरोपाला उत्तर देताना मुंडे म्हणाले की राधाकृष्ण विखे आणि मी असे दोघे राज्यात विरोधी पक्ष नेते आहोत. राधाकृष्ण विखे माझ्यापेक्षा अनुभवी असतीलही पण, मी सभागृहात सोळा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे, माझी आणि पैशाची दुष्मनी आहे त्यामुळे लायकी नसताना आरोप करू नका असे मुंडेंनी सुनावले.
भाजपला मत म्हणजे हुकूमशाहीला मत - मुंडे
२०१९ ची निवडणूक जनतेसाठी महत्वाची आहे. देश हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आघाडीला मत म्हणजे लोकशाहीला मत असून विरोधी मत देतील तर ते हुकूमशाहीला मत असेल. त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन मुंडे यांनी केले.