मुंबई -पूर्वीप्रमाणे साईबाबांच्या काकड आरती व शेजारतीच्या वेळेत बदल केल्यामुळे व शासन आदेशाप्रमाणे रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत जमावबंदी लागू असल्याने 1 मार्च 2022 पासून साईबाबांच्या इतर आरत्यांच्या नियमांप्रमाणे काकड आरती व शेजारतीकरीता भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
बानायत म्हणाल्या, गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दोन वेळा राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा राज्य शासनाच्या वतीने कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शकतत्वे ठरवून दिलेले होते. तसेच वेळोवेळी कोरोना विषाणूच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदीचे आदेश जाहीर करण्यात आलेले होते. शासनाने दिनांक ०८ जानेवारी २०२२ च्या आदेशाने दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी पासून संपूर्ण राज्यात रात्री ११.०० ते सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू असल्यामुळे श्रींची पहाटे ४.३० वाजताची काकड आरती व रात्री १०.३० वाजताची शेजारतीकरीता भाविकांना प्रवेश दिला जात नव्हता. परंतु, संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे व विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पहाटे ०४.३० वाजता व शेजारती रात्री १०.३० वाजता ऐवजी पूर्वीप्रमाणे सकाळी ०५.१५ वा. व शेजारती रात्री १०.०० वाजता करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता साईभक्तांना या दोन्ही आरत्यांना प्रवेश देणे शक्य झाले आहे. तसेच, साईभक्त व ग्रामस्थांकडूनही अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.