अहमदनगर:साईबाबांच्या मंदिरात नित्यनेमाने होणाऱ्या चारही आरत्यांच्या वेळी साईबाबांच्या समोर उभे असणारे भालदार आणि चोपदार यांच्या हातातील दंडांची चांदीचा रंग काळा पडला असल्याचे जम्मू-काश्मीर येथील अतुल गुप्ता या साईभक्ताच्या लक्षात आले. यानंतर साईबाबांना दोन चांदीचे दंड देण्याची इच्छा गुप्ता यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गुप्ता यांनी आपल्या इच्छेनुसार साईबाबा संस्थानला तब्बल 5 किलो 80 ग्राम वजनाचे दोन चांदीचे भालदार आणि चोपदार दंड दान स्वरुपात दिले. त्यांची किंमत साडेचार लाख रुपये इतकी आहे.
साडेचार लाखांचा खर्च:साईबाबांचे परम भक्त असलेले जम्मूकाश्मीर येथील अतुल गुप्ता यांना काही कामानिमित्ताने शिर्डीत येतात येत नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितले की, हे दोन दंड तुम्हीच साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करा असे शिर्डीतील मातोश्री ज्वेलर्सचे मालक नागरे यांनी सांगितले होते. त्यानुसार दोन भालदार आणि चोपदार चांदीचे दंड संस्थानला अतुल गुप्ता या भाविकाच्या नावाने देणगी स्वरूपात दिले असल्याचे नागरे यांनी सांगितले. अतिशय सुंदर नक्षीदार आणि कारागिरी केलेले हे दोन चांदीच्या भालदार आणि चोपदार दंड बनवण्यासाठी या दंडाच्या आत मध्ये सागवण्याचे लाकूड वापरण्यात आले आहे. तसेच वरून चांदी वापरण्यात आली आहे. हे दंड बनवण्यासाठी तब्बल 5 किलो 80 ग्राम चांदी लागली असुन तब्बल साडे चार लाख रुपय खर्च आला असल्याचे नागरे यांनी सांगितले आहे.