अहमदनगर- महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मांदियाळी दिसून येत असताना साईबाबांना विठ्ठल स्वरुप मानणाऱ्या भाविकांनी शिर्डीत दर्शनासाठी गर्दी केली आहे. साई मंदिराला फूलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. समाधी मंदिरातील फुलांच्या सजावटीने साई भक्तांचे लक्ष वेधले आहे.
शिर्डी माझे पंढरपूर ही आरती साईबाबा मंदिरात नित्य नियमाने म्हटली जाते. त्याचीच प्रचिती आज साईदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने दिसून येत आहे. विठ्ठल रुख्मिणीचा फोटो साई समाधी मंदिरात ठेऊन आज साईबाबांची माध्यान्ह आरती करण्यात आली.
'शिर्डी माझे पंढरपूर' म्हणत लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. अशी आहे आख्यायिका
साईबाबा हयातीत असताना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपुरला विठ्ठलदर्शनासाठी जात असत. दासगणुंची एक आषाढी वारी चुकली आणि विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले. तेव्हा विठ्ठल साक्षात समोर बघून दासगणू महाराजांनी शिर्डी माझे पंढरपूर अशी काव्यरचना केली. अशी आख्यायिका असून आजही साईमंदिरात बाबांच्या मंगल स्नानानंतर हिच आरती म्हटली जाते.
असंख्य भाविक बाबांनाच विठ्ठल स्वरुप मानुन दर आषाढीला साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जावुन विठ्ठलरुपी साईंचे दर्शन घेवुन धन्य होतात. साईबाबा संस्थाननेही आषाढी एकादशीचे महत्व लक्षात घेवुन विठ्ठलाची प्रतीमा समाधीवर ठेवुन साईबाबांच्या मुर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभूषणे चढवली आहेत. एरवी वर्षभर साईबाबांना फुलांची माळ घातली जाते. मात्र, फक्त आषाढी एकादशीलाच बाबांना तुळशीची माळ घालण्यात येते.
शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेवुन साई संस्थानच्या प्रसादालयात आज शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यंदा 60 हजार भाविकांसाठी 8 हजार किलो साबुदाणा खिचडी तयार करण्याच नियोजन संस्थानने केले आहे. प्रसादालयात आज दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी हेच जेवण म्हणुन देण्यात येते. आज रात्री विठ्ठल रुख्मिणीची प्रतीमा ठेवुन साईंच्या रथाची मिरवणुक काढण्यात येते.