अहमदनगर - कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने सगळे उद्योग धंदे बंद पडले आहेत. मात्र, शेती करण्यासाठी करण्यासाठी मुभा दिलेली आहे. शेतमाल विकताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर सरकारने उपाययोजना करण्याऐवजी उलट उत्पन्नसाठी दारुची दुकाने सुरू करुन शेतकऱ्यांची चोष्टाच केली असल्याचा आरोप तरुण शेतकऱ्याने केला आहे. शाम गाडेकर नावाच्या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवत शेतीत गांजाचे पीक घेण्यास परवानगी मागीतली आहे.
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती खालावल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी दारुची दुकाने सुरू केली जात आहेत. नशेबाजी हे उत्पन्नाचे साधन असेल तर राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याचे सरसकट परवाने द्यावी, ही शेती करण्याची आमची तयारी असल्याची मागणी शिर्डीजवळील निमगाव कोऱ्हाळे येथील शाम गाडेकर या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवर देखील त्याने आपली मागणी नोंदविली आहे.