अहमदनगर - साकळाई पाणी योजनेसंदर्भात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले. या प्रश्नावर तीन-चार दिवसांत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे राम शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर, दीपाली सय्यद यांनी तूर्तास उपोषण आंदोलन मागे घेत असून, तीस ऑगस्टपर्यंत ठोस अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा बेमुदत उपोषण आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
अहमदनगर : दीपाली सय्यद यांचे उपोषण गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर मागे श्रीगोंदा, नगर, पारनेर तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद यांनी 9 ऑगस्ट, म्हणजेच क्रांती दिनापासून नगरच्या जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते.
दीपाली सय्यद या शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दीपाली यांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. यावेळी पूरपरिस्थितीनंतर आपण साकळाईप्रश्नी मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन महाजन यांनी दिले. त्यानंतर दीपाली सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.
या साकळाई पाणी योजने संदर्भात राज्य सरकार गांभीर्यानी विचार करतंय. लवकरच याबाबत सरकार निर्णय घेईल असे आश्वासन राम शिंदे यांनी यावेळी दिले. तर, 30 ऑगस्ट पर्यंत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना दिला.