शिर्डी - गेल्या 17 मार्चपासून कारोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. साई मंदिरातून भाविकांना साईंची उदी व पवित्र स्नानाचे पाणी आणि इतर कुठलीही वस्तू संस्थानकडून दिली जात नाही. मात्र काही लोक सोशल मीडियावर पोस्ट टाकून साईबाबांच्या पवित्र स्नानाचे पाणी आणि इतर वस्तू भाविकांना पुरवत असल्याचा प्रकार शिर्डीत समोर आला आहे. भाविकांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर साई संस्थानने कारवाई करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येतात. मात्र गेल्या 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने भाविक शिर्डीत येत नाहीत. भाविकांना आता साई दर्शनाची आस लागली आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांना कुठलीही वस्तू संस्थानकडून दिली जात नाही. याचाच फायदा काही लोकांनी घेत सोशल मीडियाचा वापर करून साईंची उदी आणि स्नानाचे जल भक्तांना पुरवत असल्याचे उघड झाले आहे.
शिर्डी लाइव्ह या फेसबुक पेजवरून, भक्तांना स्नानाचे जल कुरियर चार्ज घेऊन पाठविले जाते, अशी पोस्ट टाकण्यात आली आहे. हा सर्व प्रकार शिर्डीकरांच्या लक्षात आल्यानंतर या सर्व प्रकरणाची साई संस्थानने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ करत आहेत.
यासंदर्भात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे म्हणाले की, भाविक शिर्डीत आल्यानंतर साई दर्शनानंतर भाविकांना संस्थानकडून एक उदीचे पाकीट दिले जाते. मात्र सध्या उदीची पाकीटे तयार आहेत, मात्र जल आणि इतर वस्तू भाविकांना पुरवण्यासाठी आम्ही कोणाचीही नेमणूक केलेली नाही.