अहमदनगर -ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांच्या आकस्मित मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे बोलले जातयं. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
राज्याच्या 'या' कॅबिनेट मंत्र्याच्या वहिनीची गळफास घेत आत्महत्या; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेत, आत्महत्या केली. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. तर गौरी यांच्या मृत्यू बद्दल शंका व्यक्त करत गडाख कुटुंबाबद्दल काही आरोप केले आहेत.
गौरी प्रशांत गडाख (वय-32, रा-यशवन्त कॉलनी, अहमदनगर) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या गौरी यांचे माहेर राहाता तालुक्यातील लोणी हे असून त्या विखे कुटूंबाच्या नात्यातील असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी नगरमध्ये धाव घेतली. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गौरी यांच्या मृत्यू बद्दल शंका व्यक्त करत गडाख कुटुंबाबद्दल काही आरोप केले आहेत. गौरी यांनी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आत्महत्या केल्याचे कळते, माहेरच्या नातेवाईकांनी घटना दुपारी होऊनही संध्याकाळ पर्यंत आम्हाला का कळवले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
घटनेनंतर गौरी यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्या मृत झाल्या असल्याचे गडाख कुटुंबाला सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला, मात्र नातेवाईकांनी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची तसेच शवविच्छेदन इन कॅमरा करण्याची मागणी केल्यानंतर मृतदेह पहाटे तीनच्या सुमारास औरंगाबादकडे हलवण्यात आला.