शिर्डी (अहमदनगर) -कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात नियम कडक करण्यात आले आहेत. याच धर्तीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थाननेही दर्शनाचा कालावधी कमी करत गुरुवार आणि आठवड्याअखेर मोफत बायोमेट्रीक पासेस न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आज पहिल्याच गुरुवारी तो निर्णय बदलल्याने कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाला तर भक्तांना उन्हात तासन् तास उभे राहावे लागले. यावर भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर साई संस्थाने दोन दिवसांपूर्वी साई दर्शनाचा कालावधी कमी केला होता. याच बरोबरीने मंदिराबाहेर होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी गुरुवार, शनिवार, रविवारी शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी दिले जाणारे बायोमेट्रीक मोफत दर्शन पासेस न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, तो निर्णय आज शिर्डीत गर्दी झाल्याने पुन्हा मागे घेण्यात आल्याचे पाहायला मिळत असून भक्तांना दर्शन देणे, हे आमचे काम असल्याचे साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.