अहमदनगर - आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या आणि करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीचा विकास थांबल्याने साईभक्त आणि शिर्डीकरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिर्डीच्या विकासाचे अनेक प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्षानुवर्षे मंजुरीसाठी पडून आहेत. मात्र, विश्वस्त मंडळच नसल्याने पाठपुरावा कोणी करावा असा प्रश्न आहे. तत्कालीन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना शिर्डीच्या विकासाबाबत प्रश्न विचारणारेही आता गप्प का आहेत असा सवाल उपस्थित होऊलागला आहे.
साईबाबा संस्थानच्या या प्रलंबित विकास प्रकल्पांना सरकारने मान्यता देऊन ते पूर्णत्वास नेले नाही तर संस्थानच्या अखर्चित निधीवर आयकराचे मोठे संकट उभे राहण्याची भीती आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल व दर्शन रांगेची पायाभरणीही केली. आज ही कामे पूर्णत्वास जात असली तरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, साई नॉलेज पार्क, सोलर पॉवर आदी प्रकल्प कधी पूर्णत्वास जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील विश्वस्त मंडळातील अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी शिर्डी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे यासाठी साई नॉलेज पार्क, साईसृष्टी, साई प्लँवेटोरियम, सौर उर्जा प्रकल्प, साई गोशाळा, १०० कोटीचे कॅन्सर हॉस्पिटल, स्कायवॉक, सीसीटीव्ही, शिर्डीतून जाणाऱ्या नगर- शिर्डी रस्त्याचे सुशोभिकरण, डान्सिंग फाउंटन साउंड शो, कलादालन आदी प्रकल्पांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेवून ती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली. मात्र, दोन वर्षें होवूनही या प्रस्तावांवर अद्याप सरकारने मोहर उमटवली नसल्याने शिर्डीचा विकास पूर्णपणे थांबला आहे.
शिर्डीच्या विकासाचा कळवळा दाखवणारे स्थानिक नेते शिर्डीच्या विकासासाठी हावरेंना वारंवार विरोध करणाऱ्यांच्या तोंडावर आता पाचर का बसली आहे, असा सवालही साईभक्त आणी शिर्डीकरांमधून व्यक्त होवू लागला आहे. राज्य सरकारने कान्हुराज बगाटे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक केली खरी पण त्यांनाही मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. साई संस्थान प्रशासनाला गती देण्याचे अवघड काम त्यांनी अल्पावधीतच करून दाखवले. कोरोनाच्या काळात भाविकांना सुकर दर्शनाची व्यवस्था केली. कॅन्सर हॉस्पिटलच्या कामाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बगाटे यांचा असला तरी सरकार पातळीवर त्यांनाही काही मर्यादा आहेत. शिर्डीच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून सरकारवर स्थानिकांकडून दबाव वाढवण्याची गरज आहे. राज्य सरकारने विश्वस्त मंडळाची नेमणूक केल्यास शिर्डीच्या विकासाला पुन्हा गती येवू शकते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून खेचाखेची सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांना इच्छा असूनही साई संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती करता येवू शकली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संस्थानचे रखडलेले प्रकल्प -
साईसृष्टी : चलचित्रांद्वारे व लाईट इफेक्टच्या माध्यमातून साई चरित्र भाविकांसमोर प्रस्तूत करता येणार. १०० फूट साईबाबांची मूर्ती असेल. दोन- तीन तासात संपूर्ण साई चरित्राचे भक्तांना अवलोकन होण्यास मदत होणार आहे. साई प्लँनेटोरियम सायन्स पार्क : विद्यार्थ्यांमध्ये व भाविकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होण्यासाठी अँस्ट्रोनॉमीचे विविध शोज, मुव्हीज असणार आहेत. या प्रकल्पाचा फायदा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व भाविकांना होणार आहे.
लेझर शो प्रकल्प -
पाण्यातील फवाऱ्यांद्वारे डान्सिंग फाउंटन आणि फाउंटनच्या माध्यमातून वॉटर गार्डन तयार करून त्यावर साई चरित्रातील काही भाग लेझर शो द्वारे दाखवण्यात येतील. एकाच वेळी पाच हजार भाविक बसू शकतील यासाठी भव्य स्टेडियमची उभारणी. प्रकल्पासाठी ७५ ते ९० कोटी खर्च अपेक्षित.