अहमदनगर - श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये व्यापाऱ्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून 17 लाख 20 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.
कापूस व्यापाऱ्याची 75 लाखांची रक्कम लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी आज अटक केली अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात 5 जुलै 2019ला ही घटना घडली. 2 हजाराच्या नोटांच्या बदल्यात कमिशन घेऊन सुट्टे पैसे देण्याच्या कारणाने ही लुट झाली होती. कापूस व्यापारी चांगदेव पवार यांना 6 ते 7 व्यक्तीने तलवार व पिस्तुलीचा धाक दाखवून 75 लाखांना लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली होती. तर यातील मुख्य आरोपीला दिल्ली येथील विमानतळावरून अटक करण्यात आली होती. आता या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी 2 वाहनांसह आणखी 6 आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या एकूण 16 झाली आहे. चोरी केलेले 75 लाख रुपये सचिन उदावंत, राहुल उदावंत (रा.राहुरी), सर्वेश प्रजापति (रा.जळगाव), शैलेश भंडारी (रा.शिरपूर), बिट्टु वायकर (रा.श्रीरामपूर), या 5 ते 6 आरोपींनी वाटून घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.