अहमदनगर: शहरातील विविध ठिकाणावरून सायकली चोरी करणाऱ्या अट्टल चोराला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरीला गेलेल्या ५५ हजार रुपये किंमतीच्या ११ सायकली कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दिनेश शेषराव व्यवहारे (वय ५० वर्षे) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेलर काम करणाऱ्या अजय काजी मोरे यांची सायकल सांगळे गल्ली येथून १२ तारखेला चोरीला गेली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
११ सायकली चोरल्याची दिली कबुली : या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, शहरातील विविध ठिकाणावरून दिनेश व्यवहारे याने सायकली चोरी असून, तो सायकल विक्री करण्याकरिता गाडगीळ पटांगणात येणार आहे. या माहितीच्या आधारे, कोतवाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी गाडगीळ पटांगण परिसरात सापळा लावला होता. आरोपी दिनेश व्यवहारे चोरीची सायकल विक्री करण्यासाठी आला असता त्याला कोतवाली पोलिसांनी पकडले. आरोपीची कसून चौकशी केली असता शहरातील विविध ठिकाणांवरून ११ सायकली चोरल्याची कबुली त्याने दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद दुधाळ करत आहेत.