अहमदनगर - नगर महापालिकेतील एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे कर्मचारी कामावर येण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. महापालिकेचे कामकाज बंद करण्याचे वेळ येण्याची शक्यता आहे. सोमवारी जिल्ह्यात 23 जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. यात नगर शहरातील 15 जणांचा समावेश आहे. तसेच एका तरूण व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या तरुण व्यापाऱ्याच्या वाडीलांचाही तीन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यापूर्वीही दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने कार्यालयात कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे लवकरच महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी भिस्तबाग परिसर हाॅटस्पाॅट म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 15 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे सध्या रुग्णसंख्या 963 झाली असून, 292 जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 649 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. नगर शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. सोमवारी आढलेल्या रुग्णांमध्ये गवळीवाडा येथील नऊ, चितळेरोड येथील एक आणि शहराच्या मध्यवस्तीत चार जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. भिस्तबाग परिसरातील पंचवटी काॅलनीत 16 रुग्ण आढळून आल्याने महापालिकेने तेथे आरोग्य विभागाने पथक पाठविले आहेत. नगर शहरातील बराचसा भाग आता हाॅटस्पाॅट झाला आहे. उपनगरांमध्ये रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण नगर शहरात काही दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा प्रशासन विचार करीत आहे. मनपा आयुक्तांनी तसे संकेत दिले आहेत.
पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातही रुग्णांची वाढ -
पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांत वाढ होत असून, आज भाळवणी येथील एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आढळला आहे. श्रीगोंदे शहरातील पाच, तर तालुक्यातील वडळी येथे एक रुग्ण आढळला आहे. संगमनेर येथेही रोज रुग्ण आढळत आहेत. या तालुक्यातील खेडे गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बहुतेक गावं बंद करण्याची वेळ आली आहे.