अहमदनगर- कोपरगाव शहरातील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. आज (14 एप्रिल) पहाटेच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला निमोनिया झाला असतानाच कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. नगर जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी श्रीरामपूर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -Coronavirus : नेवासे येथील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 28
देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
दरम्यान, मृत महिला ज्या भागात वास्तव्यास होती, तेथील परिसर प्रशासनाने यापूर्वीच सील केला आहे. तर महिलेच्या घरातील व संपर्कातील एकूण 13 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
हेही वाचा -अहमदनगरमध्ये अनुयायांशिवाय महामानवाची जयंती ; पुतळ्याभोवती पोलिसांचा बंदोबस्त