अहमदनगर - कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. माधव संपत शिरसाठ (वय 28 वर्षे) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात ते नोकरी करत होते. तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर ते बरे झाले होते. या दरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर ते आपल्या मुळ गावी आले होते. मित्रांसमवेत मुळा धरण येथे फिरायला गेले होते. त्यानंतर घराकडे परतत असताना वांबोरी जवळ त्यांच्या चारचाकीचा अपघात झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी आहेत.