महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल - रिझर्व्‍ह बँकेचे संचालक सतिष मराठे - सतिष मराठे शिर्डीत

सहकाराला आता सर्वव्‍यापी होवून नवे आर्थिक मॉडेल तयार करावे लागेल. या क्षेत्राकडे युवा पिढीला आकर्षित करण्‍यासाठी सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल, अशी अपेक्षा रिझर्व्‍ह बँकेचे संचालक सतिष मराठे यांनी व्‍यक्‍त केली.

Satish Marathe
रिझर्व्‍ह बँकेचे संचालक सतिष मराठे

By

Published : Apr 27, 2022, 9:57 PM IST

शिर्डी - देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचे मुळच सहकार चळवळीशी जोडले गेलेले आहे. सहकार चळवळ आता केवळ संस्‍थांपुरती मर्यादीत न ठेवता सेवा क्षेत्रांच्‍या माध्‍यमातूनही पुढे आली पाहीजे. सहकाराला आता सर्वव्‍यापी होवून नवे आर्थिक मॉडेल तयार करावे लागेल. या क्षेत्राकडे युवा पिढीला आकर्षित करण्‍यासाठी सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल, अशी अपेक्षा रिझर्व्‍ह बँकेचे संचालक सतिष मराठे यांनी व्‍यक्‍त केली.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ४२ व्‍या पुण्‍यतिथीच्‍या निमित्‍ताने सतिष मराठे यांचे सहकार आणि आर्थिक विकास या विषयावरचे व्‍याख्‍यान पुणे विद्यापीठाच्‍या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अध्‍यासन केंद्र आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आले होते. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास आ.राधाकृष्‍ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अध्‍यासन केंद्राचे प्रमुख डॉ.मुकूंदराव तापकीर, अशोक सहकारी बॅंकेचे चेअरमन प्रा.एस.झेड देशमुख, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, प्रवरा सहकारी बॅंकेचे चेअरमन अशोक म्‍हसे, राज्‍य सहकारी पतसंस्‍था फेडरेशनचे चेअरमन काका कोयटे, कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू, गणेश कारखान्‍याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या मार्गदर्शनपर भाषणात सतिष मराठे म्‍हणाले की, सहकार चळवळीने देशाच्‍या आर्थिक विकासात मोठी भागिदारी केली असली तरी, बदलत्‍या युगात अद्यापही समाजातील मोठा वर्ग हा आर्थिक प्रक्रीये पासुन दूर आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्‍या संधी या चळवळीतून निर्माण झाल्‍या असल्‍या तरी, याचे अधिक सशक्‍तीकरण करुन बळकटी देण्‍याची गरज आहे. विकासाकरीता कर्जपुरवठा वाढला पाहीजे, लोकांपर्यंत जातील अशा संस्‍थाची कार्यपध्‍दती निश्चित करावी लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.यापुर्वी देशात जागतीकीकरणाची चर्चा झाली. परंतू याचे फायदे खासगी बहुउद्देशीय कंपन्‍यांनी घेतले, सहकारी संस्‍था मात्र मागेच राहील्‍या. ही बाजू लक्षात घेवून नव्‍या सहकार मंत्रालयाच्‍या माध्‍यमातून राष्‍ट्रीय अंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील स्‍पर्धेत ही सहकार चळवळ कशी टिकू शकेल या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु झाले आहेत. सहकाराबाबत नवे राष्‍ट्रीय धोरण ठरविण्‍याच्‍या कामालाही आता वेग आला असून, देशात १५ ते १६ ठिकाणी सहकार मंत्रालयाची कार्यालये सुरु होणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सहकारी संस्‍था या सेवा संस्‍था नाहीत तर त्‍या नफा मिळवून देणा-या संस्‍था आहेत. त्‍यादृष्‍टीने इतर देशांनी विविध क्षेत्रात सहकाराचा कसा उपयोग करुन घेतला याचे दाखले देताना मराठे म्‍हणाले की, केनीया देशाचा आर्थिक विकास दर वाढविण्‍यात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. फ्रान्‍स देशाने सुध्‍दा सहकारी बॅंकींग क्षेत्राच्‍या माध्‍यमातून अर्थव्‍यवस्‍थेवर प्रभूत्‍व मिळविले. भारतात इफको सारखी संस्‍था खत विक्रीच्‍या माध्‍यमातून नावलौकीक मिळविते. अमुल सारखी संस्‍था केवळ दूग्‍ध उत्‍पादनात मर्यादीत न राहाता अन्‍नप्रक्रीया उद्योगात रुपांतरीत होते. त्‍याचप्रमाणे कृषि प्रक्रीया उद्योगाला सहकाराच्‍या माध्‍यमातून मोठ्या संधी आहेत. आता विमा आणि आरोग्‍य क्षेत्रातही सहकाराने प्रवेश करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सिलीकॉन व्‍हॉलीमध्‍ये पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन आणि वितरण हे सहकाराच्‍या माध्‍यमातून केले जाते. लोकांनी लोकांच्‍या हातात ठेवलेली ही चळवळ भविष्‍यात विविध क्षेत्रांमधून आर्थिक मॉडेल म्‍हणून पुढे आली तर, त्‍याचा निश्चितच नव्‍या रोजगारासाठी उपयोग होईल. पर्यटन क्षेत्रही आता मागे राहीलेले नाही, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशामध्‍ये पर्यटनाला दिलेले महत्‍व लक्षात घेवून सहकार चळवळीने यावरही आता लक्ष केंद्रीत करण्‍याचे आव्‍हान करुन, मराठे यांनी सांगितले की, सहकारच्‍या कायद्यांबाबत नव्‍याने पुन्‍हा विचार होण्‍याची आवश्‍यकता आहे. कारण हे ब्रिटीशकालिन कायदेच सहकार क्षेत्राला आडसर ठरत असल्‍याचे त्‍यांनी बोलून दाखविले.

ABOUT THE AUTHOR

...view details