अहमदनगर- महसूल विभागाच्या गौण खनिज विकास निधी योजनेअंतर्गत रस्ते आदी कामे पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत. या कामांचा निधी नागपूर कार्यालयाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे वर्गही झाला. परंतु, त्याची देयके अद्याप संबंधित ठेकेदारांना मिळत नसल्याने त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत.
कर्जबाजारी ठेकेदाराचे बेमुदत उपोषण; ३ वर्षांपासून रखडले कामाचे पैसे - Nagpur
महसूल विभागाच्या गौण खनिज विकास निधी योजनेअंतर्गत रस्ते आदी कामे पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत. या कामांचा निधी नागपूर कार्यालयाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे वर्गही झाला. परंतु, त्याची देयके अद्याप संबंधित ठेकेदारांना मिळत नसल्याने त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत.
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मेसर्स टी. जी. तोरडमल अँड कंपनीच्यावतीने गौण खनिज विकासनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांची तीन कामे सन २०१६ साली पूर्ण करण्यात आली होती. त्याची जवळपास ५६ लाखांची बिले नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बिलांच्या पूर्ततेसाठी नागपूर कार्यालयाकडे मागणी केली. त्यानंतर ही रक्कम अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे जमा करण्यात आली. असे असले तरी काम करणाऱ्या ठेकेदारांना ३ वर्षे उलटली तरी ती देण्यात आलेली नाही.
या बिलांच्या मागणीसाठी ठेकेदार संघटना आणि पैसे अडकलेले ठेकेदार रमेश तोरडमल आंदोलन करत आहेत. जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये पालकमंत्री, ४ आमदार आणि जिल्हाधिकारी सदस्य आहेत. या सर्वांकडे पाठपुरावा करून ससेहोलपट झाल्याची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याची तक्रार तोरडमल यांनी केली आहे. तसेच प्रश्न मार्गी लागेपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.