अहमदनगर - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
मंत्री टोपे यांनी आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोणत्या भागात किती रुग्ण आढळून आले, सध्याची परिस्थिती, औषधांची उपलब्धता आदीबाबत त्यांनी माहिती घेतली. कोविड केअर सेंटरची व्यवस्था, ते कार्यान्वित झालेत का, आदीबाबत त्यांनी विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन निधी, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीतून आरोग्य सुविधा बळकटीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यात सध्या सुरू असलेले कंटेटमेंट झोन, तेथील परिस्थिती याची माहितीही त्यांनी घेतली.