अहमदनगर- श्रावण महिन्यात धार्मिक विधीला महत्व दिले जाते. या महिन्यात घराघरात पोथीपुराण आणि पारायण सुरू केली जातात. सर्व धर्मियांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा महिना समजला जातो. एकूणच सर्वधर्मीय कोरोनाच्या काळातही आपापले सण-उत्सव कसेबसे साजरे करण्याच्या तयारीत असताना अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श ग्राम हिवरेबाजारने श्रावणाच्या महिन्यात संविधान पारायणाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
आदर्श ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. श्रावण महिन्याचा पवित्र योग्य साधून त्यांनी भारतीय संविधान वाचनाचे पारायण सुरू केले आहे. भारताच्या संविधानाची उद्देशिका काय आहे, हे सर्वांना माहीत असायलाच हवी, कारण आपल्या संविधानाचा तो आत्मा आहे.हाच उद्देश समोर ठेवून गावात रोज सकाळी नऊ ते दहा या वेळात भारतीय संविधानाचे वाचन केले जात असल्याची माहिती हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दिली.