व्हिडीओमध्ये तथ्य नसल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांची माहिती शिर्डी : गेल्या काही वर्षांपासून शिर्डीच्या साईबाबांची बदनामी करण्याचे कारस्थान काही लोक करीत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. शिर्डी साईबाबाला भक्तांनी दिलेले दान मुस्लिम धर्मांतील काही संस्थाना देण्याचे काम सुरू असल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल करण्या आला आहे. साईबाबांना देव मानू नका अशी साई संस्थानची बदनामी केली जाते. यामुळे करोडो साई भक्तांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत.
साईबाबा संस्थानची बदनामी : बांगलादेशातील एका मशिदीत लोक पैसे मोजत असल्याचा एक जुना व्हिडिओ आता खळबळ माजवत आहे. या व्हिडिओत हा पैसा शिर्डीतील साईबाबांच्या मंदिराचा असल्याचा दावा केला आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओमध्ये तथ्य नसल्याचे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ व्हायरल करून साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिर्डीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करा : साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व धर्माचे लोक शिर्डीत येतात, यावेळी अनेक भक्त स्वेच्छेने साईबाबा संस्थानला देणगी देतात. साईबाबा संस्थानकडून या मिळालेल्या देणग्या मोजल्या जातात. हे काम साई संस्थानचे कर्मचारी करतात. यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ साईबाबा संस्थानचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साई संस्थानचे सर्व पैसे जमा झाल्यानंतर लगेचच बँकेत जमा होतात. ही वस्तुस्थिती असूनही अनेकजण खात्री न करता व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
द्वारकामाई मंदिर दर्शनासाठी खुले :साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. साई बाबांचे द्वारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्वाचा निर्णय साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. साई बाबांचे द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
द्वारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले :कोरोना काळात संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने सर्वच धार्मिक तीर्थक्षेत्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा कमी होत गेला, तसे निर्बंधही शिथिल होते गेले. पुन्हा इतर मंदिरांप्रमाणे साई मंदिराचे दरवाजे देखील भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. मात्र साई बाबांचे व्दारकामाई मंदिर साईबाबा संस्थानच्या वतीने भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले आणि रात्रभर बंद ठेवण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी साई बाबांची द्वारकामाई मंदिर पूर्वीप्रमाणे रात्रभर खुले करण्याची मागणी साई संस्थानकडे केली होती. भाविक आणि शिर्डी ग्रामस्थांच्या या मागणीकडे पाहाता साई संस्थांच्या तदर्थ समितीने आजपासून पूर्वीप्रमाणे व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली आहे.