अहमदनगर- महाराष्ट्रातून रिक्त होणार्या राज्यसभेच्या खासदार पदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने ही मागणी करण्यात आली.
प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन युवकांना संघटीत केले आहे. त्याचा अपेक्षित परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेला आहे. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वतीने सत्यजीत तांबे यांना महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाची राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी शहर जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांनी केली आहे