अहमदनगर - नवज्योत सिंग सिद्धू यांची आज संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. मात्र, ते या सभेला न आल्यामुळे काँग्रेसवर ही सभा आटोपती घेण्याची वेळ आली. यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरातही आपले भाषण अर्धवट सोडत सभा स्थळावरून निघून गेले.
शिर्डीतील सभेला नवज्योत सिंग सिद्धूची दांडी; काँग्रेसवर आली सभा आटोपती घेण्याची वेळ - भाऊसाहेब कांबळे
शिर्डीतील सभेला नवज्योत सिंग सिद्धू न आल्यामुळे काँग्रेसवर सभा आटोपती घेण्याची वेळ आली.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांच्या सभेचे संगमनेर शहरात आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला या सभेची वेळ १ वाजता ठेवण्यात आली होती. मात्र, नंतर ३ आणि शेवटी ४ वाजता ही सभा आयोजित केली गेली. यावेळी सिद्धूला ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सिद्धू शिर्डी विमानतळावर पोहोचले आणि संगमनेरकडे रवानाही झाले, पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर उशीर होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू होते. त्यांना सिद्धू येणार नाही, हे कळताच त्यांनीही आपले भाषण थांबवले आणि सभा स्थळावरून निघून गेले.
यावेळी सिद्धू यांनी मोबाईलवरून संवाद साधला पण मोबाईल सुरू असलेल्या भाषणाचा आवाजही येत नव्हता. त्यामुळे नागरिकांनी सभास्थळावरुन काढता पाय घेतला.