महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपमधील आमच्याकडे आलेले भविष्यात आमचे सहकारी होऊ शकतात - महसूलमंत्री थोरात - भावी सहकारी

भाजपचे अनेक नेते आघाडीतील पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते भविष्यातील आमचे सहकारी होऊ शकतात, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

balasaheb thorat
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

By

Published : Sep 17, 2021, 7:37 PM IST

Updated : Sep 17, 2021, 7:56 PM IST

अहमदनगर -भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते आघाडीतील पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते भविष्यातील आमचे सहकारी होऊ शकतात, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये दानवे यांना उद्देशून, एकत्र आले तर भावी सहकारी असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर थोरातांनी या पद्धतीने स्पष्टीकरण दिले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
  • भाजपमध्ये नैराश्य, अनेकजण संपर्कात-

भाजपची अवस्था पाहता त्यांच्यात नैराश्य आले आहे. त्यामुळे अनेकजण शिवसेना, राष्ट्रवादी आणि कोणी काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत. ते भाजप सोडून आघाडीतील कुणाकडेही जाऊ शकतात आणि भविष्यात आमचे सहकारी होऊ शकतात, असे थोरातांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -गणेश विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

  • चंद्रकांतदादांनी भविष्यवाणी करू नये-

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, येते तीन दिवस वाट पाहा असे सूचक वक्तव्य केले होते. त्याबद्दल बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, गेली दोन वर्षे ते अशीच मुदत देत भविष्यवाणी करत आहेत, मात्र आघाडीला काही धोका नाही, पुढील तीन वर्षे सरकार आरामात काम करेल आणि पुढेही करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • जीएसटी बाबतीत राज्यांवर अन्याय नकोय-

पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये घेण्याबाबत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत थोरातांना विचारले असता, याबद्दल होणाऱ्या परिणामांचा विचार केंद्र आणि राज्य म्हणून झाला पाहिजे. राज्यांना जीएसटीमधून किती हिस्सा मिळणार हे समजले पाहिजे, असे थोरातांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्राने राज्याचे तीस-चाळीस हजार कोटी रुपये जीएसटीचे न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार, कोरोना उपाययोजना यासाठी पैशांच्या अडचणी आहेत. आम्ही कर्ज काढून राज्याच्या गरजा भागवत असताना केंद्र सरकार आपली जबाबदारी योग्य पाळत नसल्याचे थोरात म्हणाले.

हेही वाचा -बीड : दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या; विहिरीत उडी घेत संपवले जीवन

Last Updated : Sep 17, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details