अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखेर देशातील लसीकरणाची जबाबदारी घेतली. हा निर्णय चांगला आहे, पण तो घेण्यास उशीर झाला. राज्यांवर जबाबदारी ढकलून नामानिराळे राहिलेल्या मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने धारेवर धरून लसीकरण मोहिमेची सर्व माहिती मागवताच केंद्र सरकारला जाग आली आणि आज केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावर नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली
यासंदर्भात थोरात म्हणाले, की ‘देशात आतापर्यंत ज्या लसीकरण मोहिमा झाल्या. त्यांची जबाबदारी केंद्र सरकारांनीच घेतली होती. पण मोदी सरकारने आपली जबाबदारी राज्यांवर ढकलून पळ काढला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा लावून धरला. देशभरातून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणांवर टीका होऊ लागली आणि सुप्रीम कोर्टाने फटकारल्यावर आता नाईलाजाने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. आता केंद्राने जबाबदारी घेतलीच आहे. तर ती नीट पार पाडावी हीच अपेक्षा आहे.’