महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पं. नेहरूंच्या पुतळ्यासमोरची होर्डिंग्स हटविण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन - ahmednagar latest news

होर्डिंग्ज तातडीने न काढल्यास येत्या 12 जानेवारी रोजी काँग्रेस कार्यकर्ते स्वतः ही होर्डिंग्ज काढतील आणि तीव्र आंदोलन करतील असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

Congress
Congress

By

Published : Jan 7, 2021, 8:05 PM IST

Updated : Jan 7, 2021, 8:21 PM IST

अहमदनगर -नगर शहरातील आप्पू चौकात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्या सभोवताली अनेक जाहिरातींचे मोठे होर्डिंग्ज लागले असून त्यामुळे या ठिकाणी असलेला पं. नेहरू यांचा पुतळा दिसेनासा झाला आहे, याबाबत महानगरपालिकेला निवेदन देऊनही होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून आज महानगरपालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेर काँग्रेस पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

...तर तीव्र आंदोलन

ही होर्डिंग्ज तातडीने न काढल्यास येत्या 12 जानेवारी रोजी काँग्रेस कार्यकर्ते स्वतः ही होर्डिंग्ज काढतील आणि तीव्र आंदोलन करतील असा इशारा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. 31 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेने इशारा देत आयुक्तांना निवेदन दिले होते, मात्र मनपा कडून कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे आज शहर जिल्हाध्यक्षांनी आयुक्त दालना बाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

काँग्रेसचा या निमित्ताने राष्ट्रवादीवर निशाणा

अहमदनगर महापालिकेत भाजपाची सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आहे, यावरही किरण काळे यांनी अभद्र युती म्हणत टोला लगावला आहे. भाजपा हा जातीयवादी पक्ष आहे आणि महापालिकेत अभद्र युती झाली आहे, यांना पंडित नेहरूंच्या कार्याचे महत्त्व माहीत नाही का असा सवाल काळे यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

पुतळा गार्डन बनला आहे तळीरामांचा अड्डा

शहरातील हा पूर्णाकृती पुतळा एक छोटेसे गार्डन करून बसवलेला आहे. मात्र या गार्डनची दुरवस्था झाली असून याठिकाणी तळीरामांचा वावर मोठ्याप्रमाणात आहे. मद्याच्या बाटल्या, कचरा आदींमुळे या वास्तुकडे मनपाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, अशात आता गार्डनच्या सभोवताली मोठे होर्डिंग्ज लागल्याने पुतळा दिसेनासा झाला आहे.

Last Updated : Jan 7, 2021, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details