राहाता : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथे 30 मार्चपासून 5 एप्रीलपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय राहाता पालिकेने घेतला आहे. काल दिवसभरात राहाता तालुक्यात 126 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
सर्वाधिक रूग्ण शिर्डीत -
गेल्या काही दिवसांपासून राहाता तालुक्यात कोरोनाचा मोठा उद्रेक पाहावयास मिळत आहे. 28 मार्च रोजी 24 तासांत तालुक्यात 126 जणांना कोरोनाची बाधा झाली. यात सर्वाधिक 35 रूग्ण शिर्डीत सापडले. तर राहाता 17, साकुरी 4, लोणी बु. 10, लोणी खुर्द 6, वाकडी आणि सावळी विहीर येथे प्रत्येकी चार रूग्ण आढळले.
तीन दिवसांत चार जणांचा बळी -
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राहाता नगरपालिकेने मंगळवारपासून 7 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तर, शहरालगत असलेल्या साकुरीत लॉकडाऊनचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे कळते आहे. साकुरीतही रूग्णसंख्या वाढत आहे. तेथेही कठोर निर्बंध लादण्याची गरज आहे. गेल्या तीन दिवसांत राहाता व साकुरीत चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.