शिर्डी (अहमदनगर) -तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पेहेराव घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर आता शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातही भक्तांनी दर्शनाला येताना सभ्य पोशाखात यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात संस्थानच्यावतीने साई मंदिर परिसरात बोर्डही लावले गेले आहेत. सध्या भारतीय पेहराव न घालता येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेतून प्रवेश न देण्याचा निर्णय साई संस्थाने घेतला आहे. साई भक्तांच्या सूचनेवरुनच हा नियम करत आहोत. तसेच त्या आशयाचे फलक लावले गेले असल्याचे साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.
संस्थानच्या वतीने लावण्यात आले फलक -
शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आता लॉकडाऊन नंतर साई मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने शिर्डीत मोठी गर्दी होत आहे. त्यात काही भाविक हे तोडके कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले. यानंतर संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी भारतीय पेहराव करत साई दर्शनासाठी यावे, असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.