अहमदनगर -राहाता तालुक्यातील दाढ या गावातील एका मुलाने इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. वैभव गाडेकर असे या मुलाचे नाव असून तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने वैभव दररोज आठ किलोमीटर अंतर सायकलवर कापून लोणी येथे शिक्षणासाठी जात होता. यामुळेच त्याला इलेक्ट्रिक सायकल करण्याची कल्पना सुचली. वैभवने आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करुन सायकल तयार केली. त्याने साध्या सायकलमध्ये बदल करुन चार्ज केलेल्या बॅटरीवर एकावेळी तीस किलोमीटर चालेल, अशी सायकल बनवली आहे. बॅटरी संपल्यानंतर ही सायकल पायडल मारूनही चालवता यावी, यासाठी त्याने एक किट विकसित केले आहे. सायकल किती वेगाने चालली आहे, किती किलो मीटर चालली, बॅटरी किती चार्ज आहे, याची माहिती देणारी यंत्रणाही या सायकलला बसवली आहे.