शिर्डी -कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करणे, आणि राज्याची असणारी दैनंदिन तीन हजार मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज राज्यातच पूर्ण होईल यावर भर देणे गरजेचं असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
'ऑक्सिजन प्रकल्पांना राज्य सरकारकडून चालना'
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र, तिसर्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशावेळी आपण त्यासाठी आवश्यक आरोग्य सुविधांनीयुक्त असले पाहिजे. पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसर्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात गजर लागत असल्याचे दिसून आले. आपल्याला ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळेच अशा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे आणि प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. आपल्या राज्यासाठी आवश्यक ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी असे प्रकल्प उभारणी करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
'साईबाबा संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतला'
श्री साईबाबा यांनी कायमच गरीब-गरजूंना मदत केली आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो भक्त देश आणि विदेशात आहेत. साईबाबा संस्थानने हाच सेवेचा वारसा पुढे चालविल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, संस्थानने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा घेतलेला निर्णय हा रुग्णांचे जीव वाचविणारा ठरणार आहे. याशिवाय, आरटीपीसीआर चाचण्यांमधून बाधितांना शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. संस्थानने नेहमीच संकटाच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.