अहमदनगर : हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधात, आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर परतताना काही समाजकंटकांनी घरावर दगडफेक केली. अचानक दगडफेक झाल्याने घरातील महिला आणि लहान मुले घाबरून गेले. विशेष म्हणजे या समाजकंटकांनी पोलिसांच्यासमोर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा समनापूर गावात तैनात करण्यात आला असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
समाज कंटकांवर कारवाई: तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. परंतु या वादाचे मूळ कारण मात्र समजू शकले नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला हे स्वतः घटनास्थळी पोहोचले. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच आमच्या गावात कोणतेही वाद नसून बाहेरील लोकांनी हे कृत्य केले आहे. लवकरात लवकर या समाजकंटकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
भव्य निषेध मोर्चा :संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात होणार्या गो हत्या, लव्ह जिहाद आणि काही दिवसापूर्वी शहरातील जोर्वे नाका येथे हिंदू तरुणांना झालेल्या मारहाणी निषेधार्थ सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने संगमनेर शहरातून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी निषेध म्हणून स्वयमस्फूर्तीने बंदचे आवाहन केले होते. संगमनेर शहरासह तालुक्यातील अनेक गावात सकाळ पासुनच बंद पाळला गेला. सकल हिन्दु समाज्याने घेतलेल्या भूमिकेला पाठींबा देत अकोले तालुक्यातील अनेक गावात तसेच विखे पाटील यांचे लोणी गावातही बंद पाळण्यात आला.