शिर्डी -कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून चांगले काम करत, साईबाबांच्या आरोग्य सेवेचा वारसा समर्थपणे सुरू ठेवल्याबद्दल साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड ऐवजी इतर रुग्णांवर उपचार करण्याची केलेली मागणी मान्य करण्यात आली असल्याची माहीती शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी दिली.
कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा लाभ हजारो गोरगरीब रुग्णांना झाला. साईबाबा सुपर रुग्णालय, साईनाथ रुग्णालय आणी कोविड सेंटर आदी ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. यावर मात करण्यासाठी शिर्डीत ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक आरटीपीरीआर लॅबची देखील निर्मिती करण्यात आली आहे. या कामांसाठी बगाटे यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केले.