अहमदनगर(राहाता) - रयतमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून 20 लाख, तर इतर ठिकाणच्या नोकरीचे आमिष दाखवून 6 जणांची ५८ लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या रँकेटची सूत्रधार नाशिक जिल्ह्यातील महिला व तिचा पती असून, सर्व जण फरार झाले आहेत. तर रयतचे हेडक्लार्क भाऊसाहेब पटेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 12 तारखेला औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही फसवणुकीची घटना २०१४ ते ७ सप्टेंबर २०२० या कालावधीत राहता येथे घडली आहे.
नोकरी लावून देतो सांगत फसवणूक काय आहे प्रकरण?
या प्रकरणी धीरज प्रकाश पाटील (रा. साकुरी ता राहाता) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी दिनेश गोविंद सोनवणे, पत्नी बिना दिनेश सोनवणे (गायकवाड) व भाऊसाहेब पांडुरंग पेटकर यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार धीरज पाटील हे साकुरी येथे राहत असताना त्यांची बिना सोनवणे व दिनेश सोनवणे यांच्यासोबत ओळख झाली. पाटील पती-पत्नी हे दोघे बीए-बीएड असल्याने तुम्हाला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो त्यासाठी २० लाख रूपये घेतले, यातील आरोपी महिला बिना सोनवणे ही राहाता येथील रयत शिक्षण संस्थेत काही दिवस हंगामी शिक्षिका म्हणून काम करत होती. तर तिचा पती धुळे येथे शासकीय नोकरीत मोठ्या हुद्यावर असल्याचे तो सांगत असे, तर तिसरा आरोपी भाऊसाहेब पेटकर हा रयत शिक्षण संस्थेत सेवेत आहे. या तिघांनी मिळून ही सर्व फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदारने केला आहे. तक्रारदार धीरज पाटील यांच्या पत्नीने रयत चे हेडक्लार्क भाऊसाहेब पेटकर यांच्या सांगण्यावरून सोनवणे दाम्पत्याला पैसे दिले असल्याचे सांगितले आहे, तर पेटकर हे अरुण कडू यांचे पीए असल्याचे आम्हाला सांगितले असल्याचा आरोप तक्रारदारने केला आहे.
सात जणांची फसवणूक
सात जणांची सुमारे ५८ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात राहाता पोलिसांनी भादवी कलम ४२०, ४१९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये करत आहेत. या दोघांच्या व्यतिरिक्त अनेक जणांची सोनवणे दाम्पत्याने नोकरीला लावून देतो असे सांगत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सोनवणे यांचया घरात भांडी धुण्याचे काम करणाऱ्या महिलेलासुद्धा तब्बल 7 लाख रुपयांना फसवले असल्याचे समोर आले आहे.