अहमदनगर- मुख्यमंत्र्यांना पूरपरिस्थितीची गांभीर्यता नाही, मंत्रालयातील वॉररूम ऐवजी ते मतोश्रीवरून सूचना करत आहेत, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पक्षीय संघटनात्मक बैठकीसाठी आज शुक्रवारी अहमदनगर येथे ते आले असता त्यांनी सद्य पूरपरिस्थिती वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत टीकास्त्र सोडले.
वॉररूम ऐवजी मातोश्रीवरुन काम पाहणाऱ्या ठाकरेंना पूरपरिस्थितीची गांभीर्यता नाही- पाटील 2019 ला आम्ही पुराच्या पाण्यात उभे राहून आदेश काढले -
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी 2019 साली कोल्हापूर आदी भागात आलेल्या पूरपरिस्थितीची आठवण देत त्यावेळी तब्बल पंधरा दिवस पूरस्थिती होती. मात्र माझ्यासह देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी पाण्यात उभे राहून काम केले. पाण्यात पाय असताना आम्ही अनेक अध्यादेश काढून प्रशासन, जनतेला तातडीने मदत मिळवून दिली. मात्र सध्याचे चित्र पाहता ना प्रशासन दिसत आहे ना सरकार.. मुख्यमंत्री मंत्रालयाच्या वॉररूममध्ये बसून परस्थिती हाताळण्याऐवजी मतोश्रीवरून सूचना करत आहेत. चिपळूणमध्ये 36/36 तास लोकांना मदत मिळत नाही. कोल्हापूरमध्येही लोकांना मदत नाही. पुरात अडकलेले लोक आम्हाला फोन करत आहेत, कारण प्रशासन कुठे दिसत नाही. पालकमंत्री सतेज पाटील, उदय सामंत काय करत आहेत, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती केला.
तातडीच्या मदतीसाठी सरकारने तिजोरी उघडावी -
आम्ही 2019 ला फिल्डवर उभे राहून मदत केली, 6 हजार 700 कोटींचे पॅकेज दिले. मात्र ठाकरे सरकारचे गेल्या अठरा महिन्यातील कामकाज पाहता हे सरकार दिवसा तिजोरी बंद ठेवत केवळ केंद्राकडून अपेक्षा ठेवून आहे. राज्याने लगेच आपली तिजोरी उघडून मदत सुरू करावी, केंद्र नियमानुसार मदत करेलच. मात्र यांच्या तिजोऱ्या दिवसा बंद असतात आणि रात्री भ्रष्टाचार करण्यासाठी उघडतात.
मनसेने परप्रांतीयाबाबत भूमिका स्पष्ट करावी -
मनसेने परप्रांतीय भूमिका बदलली तर विचार होईल, राज ठाकरेंनी याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मुंबईत चर्चा करू. असे सांगितले आहे. मनसेच काय जेही आमच्या अटी मानून सोबत येतील त्यांना घेऊ, अन्यथा आमचे एकला चलो हे आहेच, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, मुंबईत जर उत्तर भारतीयांच्या टॅक्सी फोडल्या तर त्याचे उत्तर आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये द्यावे लागते, त्यामुळे राज ठाकरेंनी परप्रांतीयाबाबत धोरण स्पष्ट करावे, याबाबत राज ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकेबाबत गैरसमज असल्याचे म्हटल्याने त्यावर त्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे. त्यानंतर राज्य भाजप कार्यकारिणी त्यावर निर्णय घेईल असेही ते म्हणाले.
केंद्रात मंत्रिपद हे भौगोलिक, सामाजिक आणि पात्रता पाहून ठरवले जाते -
केंद्रात नुकताच मंत्रिविस्तार झाला आहे. मात्र यात खा. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेबाबात चंद्रकांत पाटलांना विचारले असता, त्यांनी नाव न घेता केंद्रात मंत्रिपद हे भौगोलिक, सामाजिक आणि पात्रता पाहून ठरवली जाते, एकाला न्याय मिळतो तेव्हा कुणावर तरी अन्याय होत असतोच, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मविआ सरकार पाडण्यात रस नाही -
मविआ सरकार पाडण्यासाठी मुहूर्त नाही, सत्तेचा फेविकॉल मजबूत असतो. पण तो त्यांच्या ओझ्यानेच तुटेल. आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार नाही. महाविकास आघाडीतीलच एखादा पक्ष बाहेर स्वतः पडेल आणि हे सरकार कोसळेल, त्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -Weather Update: पुढचे ४ दिवस राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज