अहमदनगर - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आले होते. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेसह इतर सहभागी यंत्रणा कोरोना परिस्थितीत करत असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर झालेल्या विविध यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय पथकाने आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात करत असलेल्या उपाययोजना बाबत समाधान व्यक्त केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह आणि डॉ. सितीकांता बॅनर्जी या दोन सदस्यीय पथकाने सोमवारी अहमदनगर येथे भेट दिली. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबत आढावा बैठक घेण्यापूर्वी या पथकाने जिल्हा रुग्णालय येथील कोविड रुग्णालय, दीपक रुग्णालयातील कोविड रुग्णालय तसेच श्रमिकनगर आदी भागांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. साळुंके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आदी उपस्थित होते. त्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
लगतच्या जिल्हयातील परिस्थिती पाहता अहमदनगर जिल्हयातील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्हाभरात सर्वेक्षण वाढवून संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना पथकाने केली. ही परिस्थिती अशीच नियंत्रणात राहण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर, अॅंटीजेन चाचण्या होत आहेत. खाजगी प्रयोगशाळांतून तपासणी होत आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी दिली.