अहमदनगर - शिर्डी साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला मर्यादा आल्या आहे. यावेळसचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे मंदिरावर आकर्षक अशी फुलांची व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात येता येणार नाही. त्यामुळे भाविकांना येथील सजावट ऑनलाईन पहावी लागणार आहे.
गुरुपौर्णिमा घरातच साजरी करा...साई संस्थानचे आवाहन
साईबाबांचा गुरुपौर्णिमा उत्सव 4 जुलै ते सहा जुलैपर्यंत असणार आहे. साईबाबा संस्थानमार्फत मोजक्याच लोकांच्या व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जाणार आहे. दरवर्षी गुरू पौर्णिमेला शिर्डीत अनेक दिंड्या पायी येत असतात.
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मंदिर दरवर्षीप्रमाणे सजवण्यात आले आहे. साईबाबांचे समाधी मंदिर तसेच श्री द्वारकामाई मंदिर, गुरुस्थान मंदिर, साई चावडी मंदिर याठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवालात ऑनलाइन का होईना करोडो साईभक्त घरात राहून या उत्सवात मनोमन सामील होत आहेत. गुरुपौर्णिमा आपल्या घरातच श्री साई स्तवन मंजिरी, साई चरित्र पारायण, साईंची आरती, पूजा-अर्चा करुन साजरी करण्याचे आहवान संस्थानकडून करण्यात आले आहे.