अहमदनगर- जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चोंडी शिवारात पोलिसांनी पकडला. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकासह दोन जणांना अटक केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात छापा टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हस्तगत केला गेला होता. त्यानंतर आता पुन्हा २४ टन तांदूळ पकडल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार, गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ जप्त; पाच जणांवर गुन्हा दाखल
पंधरा दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात छापा टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हस्तगत केला गेला होता. त्यानंतर आता पुन्हा २४ टन तांदूळ पकडल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी सोनेगाव, नान्नज, चोंडी, चापडगावमार्गे जाणार आहे. या खबरीवरून सातव यांनी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एका पथकाने चापडगाव परिसरात ही कारवाई केली. चोंडी शिवारात तांदळाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच ४५ टी ७३९६) आला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे, पोलीस नाईक केशव व्हटकरे, भरत गडकर, आण्णासाहेब कोळेकर, संतोष साबळे, हृदय घोडके, आदीत्य बेलेकर, सागर जंगम, लहू खरात यांच्या पथकाने सदर ट्रक अडवला. ट्रकचालक शशिकांत भीमराव गवळी (रा. कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर) व सहायक चालक संदिप सुनील लोंढे रा. बारलोणी ता. माढा, जि. सोलापूर यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपी ट्रक चालक याने सोनेगाव येथील सुग्रीव वायकर यांचा माल असून तो गुजरात राज्यातील नवसारी घेऊन जात असल्याचे कबूल केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी याबाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना माहिती दिल्यानंतर पुरवठा अधिकारी रवींद्र बोरगावकर यांना सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान तपासणीत या तांदळाचा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. २४ टन तांदूळ अपहार किंमत ३ लाख ६० हजार रूपये व मालवाहतूक ट्रक किंमत १० लाख असा एकूण १३ लाख ६० हजार रुपये किमतीचा माल जप्त करून जामखेड पोलिसात जमा केला आहे.