अहमदनगर- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) राज्यातील विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या वतीने तक्रा अर्ज दिल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर महाड, नाशिक, पुणे, औरंगाबाद इतर ठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप कार्यालयासमोर राणेंची प्रतिमा जाळली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद शिवसेनेकडून अहमदनगरमध्ये उमटले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर आक्रमक घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांनी गांधी मैदानातील भाजप शहर कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली. यावेळी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, स्मिता अष्टेकर, अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, रोहन ढवण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा -अण्णा हजारेंनी तुकाराम मुंढेंसारखं न घाबरता काम करण्याचा सल्ला दिला - तहसीलदार ज्योती देवरे