शिर्डी (अहमदनगर)- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर तसेच परिसरातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. साईबाबा मंदिर आणि परिसरात कर्मचारी आणि अधिकारी वगळता इतरांना जाण्यास बंदी आहे. असे आसताना साईबाबांच्या चावडीत शिवप्रिया नामक महिलने प्रवेश केला. या प्रकरणी साईबाबा संस्थानने दिलेल्या तक्रारीवरुन साथ रोग प्रतिबंध कायद्यानुसार शिर्डी पोलीसांनी शिवप्रिया या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
टाळेबंदीमुळे साईबाबा मंदिर आणि परिसरातील व्दारकामाई चावडी, मारुती मंदिर अशा ठिकाणी भाविकांना आत प्रवेश करण्यास 17 मार्चपासून साई संस्थानच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. तसेच साईबाबा संस्थानने याठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करत बॅरिकेटींग केले आहे. मात्र, गुरुवारी (दि. 25 जून) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवप्रिया नामक महिलेने साईबाबांच्या चावडीत प्रवेश मिळवला. आत जाऊन तिने चावडीतील साईंच्या फोटोजवळ 'फोटो सेशन' केले. एवढ्यावर न थांबता, वाढदिवसानिमित्त आपण टाळेबंदीमध्ये चावडीत जाऊन दर्शन घेतल्याचे सांगत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या ठिकाणचा सुरक्षा रक्षक दोन पाच मिनिटे बाहेर गेल्याने आपल्याला ही संधी मिळाली असल्याचे सांगत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर सर्व संस्थान यंत्रणा जागी झाली आहे.