महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाथर्डी तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लग्न; नवरदेवासह 25 जणांंविरोधात गुन्हा दाखल - child marriage in shirsathwadi

पाथर्डी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नवरदेव मुलगा, मुलाचे आई-वडील, मुलीचे वडील, लग्न लावणारे भटजी, लग्नासाठी मंडप-डेकोरेशन करणारे व्यावसायिक आणि लग्नास उपस्थित असणारे दोन्हीकडच्या नातेवाईकांचा समावेश आहे. शिरसाठवाडीच्या ग्रामसेवकाच्या तक्रारी नंतर शुक्रवारी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीचे लग्न;
अल्पवयीन मुलीचे लग्न;

By

Published : Aug 28, 2021, 10:20 AM IST

अहमदनगर- बाल विवाह विरोधी कायदे करूनही अद्यापही चोरून बाल विवाह होत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी इथे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये नवरदेव मुलगा, मुलाचे आई-वडील, मुलीचे वडील, लग्न लावणारे भटजी, लग्नासाठी मंडप-डेकोरेशन करणारे व्यावसायिक आणि लग्नास उपस्थित असणारे दोन्हीकडच्या नातेवाईकांचा समावेश आहे. शिरसाठवाडीच्या ग्रामसेवकाच्या तक्रारी नंतर शुक्रवारी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या मर्जी संस्थेने घेतली बालविवाहाची दखल-

पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी इथे २५ ऑगस्ट रोजी एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले. याबाबतची माहिती मुंबई येथील मर्जी या सामाजिक संस्थेला समजल्यानंतर संस्थेचे संस्थापक मंगेश सोनवणे यांनी ही माहिती अहमदनगर येथील चाईल्डलाईन, बालकल्याण समिती आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानंतर चाईल्डलाईनचे सदस्य प्रवीण कदम यांनी पाथर्डी पोलीस आणि शिरसाठवाडीच्या ग्रामसेविका अर्चना विठ्ठल सानप यांच्याशी संपर्क करून सदर प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर ग्रामसेविका अर्चना सानप यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली. पाथर्डी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गावपातळीवरील समितीची जबाबदारी-

बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची एक देखरेख समिती असते. या समितीने बालविवाह होत असतील तर ते रोखणे किंवा त्याबाबत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असते. मात्र शिरसाठवाडी इथे २५ ऑगस्टला चौदावर्षीय मुलीचा विवाह झालेला असतानाही दखल घेतली नाही. याबाबत आम्हाला मुंबईत माहिती मिळते पण स्थानिक गावपातळीवर बालविवाह होऊनही कारवाई होत नाही, अशी खंत मुंबईतील मर्जी या सामाजिक संस्थेचे मंगेश सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी मोठ्याप्रमाणात खर्च केला जात असतानाही बाल विवाह होत असल्याने यामध्ये प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details