अहमदनगर - पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा त्यांच्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी बैलाची विधीवत पुजा करुन त्याचे आभार मानले जातात. मात्र, हे आभार संगमनेर तालुक्यातील एका बैलाला चांगलेच महागात पडले आहेत. या बैलाने औक्षणाच्या ताटातील नैवेद्यासोबत सोन्याचे 'गंठण' गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर शस्त्रकिया करुन हा दागिना बाहेर काढण्यात आला असला, तरी शेतीकामासाठी हा बैल काही कामाचा न राहिल्याने तो विकावा लागल्याची माहिती आहे.
हेही वाचा -बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन
संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर येथील शेतकरी बापूसाहेब प्रभाकर शिंदे यांच्याकडे खिल्लार बैलाची जोडी आहे. पोळ्याच्या दिवशी या बैलांचे औक्षण करतांना यापैकी एका बैलाने पूरणपोळीच्या नैवेद्यासोबत ताटातील चार तोळ्यांचे सोन्याचे 'गंठण'ही गिळल्याचा प्रकार समोर आला होता. हे गंठण शिंदेंच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचे असून पुजेसाठी ते आणण्यात आले होते. यानंतर हे सोनं विष्ठेसोबत बाहेर पडेल याची वाट शिंदे कुटूंबियांनी तब्बल 8 दिवस पाहिली. मात्र, दागिना बाहेर पडला नाही. दरम्यान, सासरच्या मंडळीच्या धाकाने शेजारी महिलेने गंठण परत मिळवण्यासाठी तगादा लावला. मात्र. शिंदेंची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना या दागिन्याचा मोबदला देणे शक्य नव्हते. शेवटी त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया करून बैलाच्या पोटात अडकलेले गंठण बाहेर काढण्यात आले. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर बैलाची प्रकृती ढासाळली आणि तो शेतीकाम करण्याच्या योग्य राहिला नाही. यामुळे शिंदेंना नाईलाजाने हा बैल विकावा लागला. दरम्यान, सोन्याचे हे औक्षण बैलाला चांगलेच महागात पडले आहे.
हेही वाचा -लोकसभा लढवणार नाही, विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतूनच - पृथ्वीराज चव्हाण