अहमदनगर -भाजप सरकार मधील मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत राज्यात लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत शरद पवारांचे नातू रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. आता त्यांना नामदार करा अर्थात मंत्री करा अशा आशयाचे अनेक बॅनर्स कर्जत आणि जामखेड शहरात दिसत आहेत. नेमके हे बॅनर्स रोहित यांच्या संमतीने लावलेत की उत्साही कार्यकर्त्यांनी स्वतःच लावलेत हे पुढे येत नाही आहे. आता रोहित पवार हे मंत्रिपदासाठी पक्षावर अर्थात आपले आजोबा शरद पवार यांच्यावर दबावतंत्रतर वापरत नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवारांना नामदार करा, कर्जत-जामखेड लागले बॅनर्स बॅनर्सवर थेट शरद पवार यांना रोहित यांना नामदार करा असे साकडे घालण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील समस्थ ग्रामस्थ, शेतकरी, कष्टकरी, युवक यांच्यावतीने हे साकडे थेट 'साहेबां'ना घालण्यात आल्याने हे बॅनर्स जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहेत..
अजित पवार नंतर रोहित पवार यांचे दबावतंत्र -
रोहित पवार यांचे चुलते अजित पवार यांनी केलेले तात्कालिक बंड, यादरम्यान रोहित पवार यांनी बजावलेली महत्वाची भूमिका, आजोबा शरद पवार आणि आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी वाढलेली जवळीक एक चर्चेचा विषय ठरली आहे. रोहित यांच्याकडे शरद पवारांचे वारसदार म्हणूनही एक गट आतापासूनच पाहू लागला आहे. विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर कर्जतमध्ये झालेल्या विजयी सभेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. अजित पवार हे नाराज असल्याचे एव्हाना अनेकदा पुढे आले आहे. त्यांच्या मंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाबाबत पक्षाने अजूनही जाहीर घोषणा केलेली नाही. त्यामुळेच 'हीच ती वेळ' अशी भावना कार्यकर्त्यांत असू शकते. त्यामुळेच एक रणनीती आणि दाबावाचा भाग म्हणून या बॅनरबाजी कडे राजकीय विश्लेषक पाहत आहेत.