अहमदनगर- राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रक्ताचा तुडवडा वाढत आहे. याशिवाय कोरोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. जामखेड पोलीसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरलं आहे. महाराष्ट्र दिनी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ३५० युवकांनी रक्तदान केले आहे.
जामखेड पोलिसांची सामाजिक जाणीव
अहमदनगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जामखेड पोलीस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलीस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून, महाराष्ट्र दिनी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतीसाद मिळत आहे. याचे उद्घाटन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.